रावेर एसटी आगाराच्या ताफ्यात दोन नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल!

आमदार नंदकिशोर महाजन यांच्या पाठपुराव्याला यश; प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण!
रावेर | स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस | जळगाव जिल्हा प्रतिनिधी : विनोद तायडे
रावेर तालुक्यातील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, रावेर एसटी आगाराच्या ताफ्यात दोन नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या आहेत. आमदार नंदकिशोर महाजन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या बसेस उपलब्ध झाल्याने रावेर तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
विद्यार्थी, नोकरदार आणि ग्रामीण प्रवाशांना दिलासा!
रावेर तालुक्यातील अनेक गावांमधील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिक दैनंदिन प्रवासासाठी एसटी बससेवेवर अवलंबून आहेत. वाढती प्रवासी संख्या आणि उपलब्ध बससेवेवरील ताण लक्षात घेता नवीन बसेसची आवश्यकता होती. ही गरज ओळखून आमदार नंदकिशोर महाजन यांनी परिवहन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने दोन नवीन बसेस रावेर आगाराच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.
या बसेसमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेलाही बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लोकार्पण सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला रावेर नगराध्यक्ष संगीताताई भास्कर महाजन, माजी नगराध्यक्ष पद्माकरजी महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रल्हाद पाटील, सुनील पाटील, मंडळ अध्यक्ष दुर्गेश पाटील, रवींद्र पाटील, उमेश महाजन, चंदू पाटील, रेखाताई बोंडे, जगदीश पाटील, बाळा अमोदकर, जितेंद्र पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
तसेच एसटी आगाराच्या वतीने डेपो मॅनेजर नेहा गजरे यांचीही उपस्थिती होती.
रावेरच्या सार्वजनिक वाहतुकीला मिळणार नवे बळ!
नवीन बसेस रावेर आगारात दाखल झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. एसटी सेवा अधिक नियमित, सक्षम आणि प्रवाशांच्या गरजेनुसार उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
आता नवीन बसेसचा प्रत्यक्ष वापर कोणत्या मार्गांवर आणि कोणत्या वेळापत्रकानुसार केला जाणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.






