सिंदखेड राजासह पाच ऐतिहासिक गावांसाठी विकासात्मक कॉरिडॉर उभारण्याची डॉ. गणेश मान्टे यांची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रमाता माँ जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा आणि परिसरातील अन्य चार ऐतिहासिक गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्वतंत्र ‘विकासात्मक कॉरिडॉर’ तयार करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे बुलढाणा माजी जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश बाबुराव मान्टे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ६ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्याच्या पर्यटन विभागाच्या प्रधान सचिवांना निवेदन सादर केले होते.
या निवेदनात सिंदखेड राजा, आडगाव राजा, किनगाव राजा, मेहुणा राजा आणि देऊळगाव राजा या २० किलोमीटरच्या परिसरातील पाच ऐतिहासिक गावांचा समावेश करण्याची विनंती करण्यात आली आहे. या गावांमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू असून त्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व मोठे आहे. या वास्तूंचे योग्य जतन व संवर्धन तसेच परिसराचा अपेक्षित पर्यटन विकास झालेला नसल्याचे डॉ. मान्टे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
पर्यटन विभागाने पुढाकार घेऊन या पाचही गावांसाठी विशेष विकासात्मक कॉरिडॉर उभारल्यास ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन होण्यासोबतच परिसराच्या पर्यटन विकासाला चालना मिळू शकते. या माध्यमातून ऐतिहासिक किल्ले, गढ्या, राजवाडे आणि अन्य वास्तूंचे संवर्धन, पर्यटनस्थळांना जोडणारे रस्ते, पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, स्वच्छतागृहे, पार्किंग तसेच अन्य पायाभूत सुविधा विकसित करता येऊ शकतात. पर्यटकांची संख्या वाढल्यास हॉटेल व्यवसाय, वाहतूक, स्थानिक लघुउद्योग आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसायांना चालना मिळून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. विशेषतः राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या जन्मभूमी असलेल्या सिंदखेड राजाला राष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक महत्त्वाचे स्थान मिळण्यास मदत होऊ शकते.
या पाचही गावांचा एकात्मिक विकास आराखडा तयार करून ऐतिहासिक वारशाचे जतन, पर्यटन सुविधांचा विस्तार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागाने या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करावा, अशी भूमिका डॉ. मान्टे यांनी निवेदनातून मांडली आहे.






