सहा महिने सभा नाही त्यात सत्ताधाऱ्यांचे १३ नगरसेवक असताना, १० मिनिटांत २१ ठराव मंजूर होतात कसे ?

आवाज न्यायाचा
स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
अरुणा दत्तात्रय खंडागळे
चिखली. तालुका. प्रतिनिधी
चिखली नगरपालिकेत भाजपने लोकशाहीचा गळा घोटला : राहुलभाऊ बोंद्रे
बुलढाणा : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम ८१ (१) नुसार दर महिन्याला सर्वसाधारण सभा घेण्याची तरतूद असताना चिखली नगरपालिकेत तब्बल सहा महिने सभा झाली नाही. विशेष म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवकांनी सभा घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्याकडे तब्बल तीन वेळा निवेदने सादर केली. आवश्यक संख्येने नगरसेवकांनी मागणी करूनही सभा घेण्याबाबत प्रशासनाने ठोस कार्यवाही केली नाही. अशातच नगरपालिकेने १८ नोव्हेंबर रोजी सभा घेवून अवघ्या १० मिनिटात २१ ठराव मंजूर केले. यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे सत्ताधारी गटाचे १४ नगरसेवक असताना प्रत्यक्ष सभेला केवळ १३ च नगरसेवक उपस्थित होते. असे असताना उपस्थिती रजिस्टरवर १४ नगरसेवकांच्या सह्या कशा नोंदविल्या गेल्या ? बहुमत नसताना ठराव मंजूर होतात कसे ? बॉम्बे मार्केटला हात लावणार नाही, व्यापाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही, असे आश्वासन देणाऱ्या भाजपच्या स्थानिक आमदारांनी आता जनतेला उत्तर द्यावे ? अशा थेट सवालांची सरबत्ती करत लोकनेते तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी सत्ताधारी भाजपच्या कारभाराची अक्षरशः पोलखोल केली. सहा महिन्यांनंतरची सभा अवघ्या दहा मिनिटांत गुंडाळून चिखली नगरपालिकेत भाजपने लोकशाहीचा गळा घोटल्याचा घणाघातही त्यांनी केला.
काँग्रेस नेते राहुलभाऊ बोंद्रे यांनी सोमवार २२ नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथील गांधी भवनात पत्रकार परिषद घेवून सत्ताधारी गटासह नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार आक्षेप नोंदवले. याप्रसंगी नगरपरिषद विरोधी पक्षनेते डॉ. मोहम्मद इसरार, काँग्रेस शहराध्यक्ष गोपाल देव्हडे, कार्याध्यक्ष डॉ. अमोल लहाने, आनंद बोंद्रे, पि.एस. वायाळ सर, गोकुळ शिंगणे, जक्का उल्ला खान, आनंद बोंद्रे, संतोष देशमुख, प्रशांत भटकर, रत्नदीप शिंगारे यांच्यासह काँग्रेस नगरसेवक उपस्थित होते.
पुढे बोलताना राहुलभाऊ बोंद्रे म्हणाले की, नगरपालिकेच्या सभेच्या अजेंड्यावर कर आकारणी, पाच एकर जागेवरील प्रस्तावित बीओटी शॉपिंग कॉम्प्लेक्स, आरोग्य, पाणीपुरवठा आणि दुष्काळी परिस्थितीशी संबंधित अशा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या २१ विषयांचा समावेश होता. या प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा होणे, नगरसेवकांना आपली मते मांडण्याची संधी मिळणे आणि आवश्यकतेनुसार मतदान होणे अपेक्षित होते. मात्र, विषय पुकारला जाताच सत्ताधारी नगरसेवकांकडून ‘मंजूर, मंजूर’ असा आवाज दिला जात होता. विषयाचे गांभीर्य, त्यातील तरतुदी, आर्थिक परिणाम आणि नागरिकांच्या हिताशी संबंधित प्रश्न यांचा विचार करण्यासाठीही वेळ न देता अवघ्या दहा मिनिटांत सभा आटोपण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुलभाऊंनी दाखविला पत्रकारपरिषदेत पेनड्राईव्ह आणि तो व्हिडीओ
चिखली नगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधी गटाचे प्रत्येकी १४ नगरसेवक असे समान संख्याबळ आहे. सत्ताधारी गटाच्या १४ नगरसेवकांपैकी प्रत्यक्ष सभेला १३ नगरसेवकच उपस्थित होते. असे असताना १४ नगरसेवकांच्या उपस्थितीची सही रेकॉर्डवर कशी आली, याची चौकशी झाली पाहिजे. याबाबत पुष्टी देताना सभेच्या इतिवृत्ताचा रेकॉर्डिंग असणारा पेनड्राईव्ह चक्क पत्रकार परिषदेत राहुलभाऊंनी दाखवला. भाजपच्या स्थानिक आमदारांनी निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बॉम्बे मार्केटला हात लावणार नाही, असे सांगितले होते. तो व्हिडीओ दाखवत राहुलभाऊ बोंद्रे यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. व्यापाऱ्यांना दिलेले आश्वासन पाळण्याची हिंमत दाखवा, अन्यथा जनतेसमोर माफी मागा, असे आव्हान त्यांनी दिले.
पाच एकरांच्या बीओटी प्रकल्पासाठी एवढी घाई का?
बीओटी तत्त्वावरील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या प्रस्तावावर राहुलभाऊ बोंद्रे यांनी विशेष आक्षेप घेतला. जयस्तंभ चौकाच्या मागील बाजूस असलेली सुमारे पाच एकर जागा ही आठवडी बाजारासाठी दान स्वरूपात नगरपालिकेला मिळालेली असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या जागेचे बाजारमूल्य मोठे आहे. अशा ठिकाणी सुमारे १६०० ते १८०० दुकानांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या प्रकल्पामुळे आठवडी बाजाराचे काय होणार? सध्या या परिसरात व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या लहान व्यावसायिकांचे पुनर्वसन कसे होणार? त्यांच्यासाठी पर्यायी जागा कोणती? या प्रश्नांची उत्तरे नगरपालिकेने अद्याप दिलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
कुत्र्यांच्या नसबंदीच्या नावाखाली कोट्यवधींचा घोळ
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आणि नसबंदीच्या नावाखाली चिखली शहरात मोठा आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याची माहिती शहराध्यक्ष गोपाल देव्हडे यांनी दिली. प्रशासकीय काळात नसबंदीपोटी तब्बल ३६ लाख रुपयांचे बिल काढण्यात आले. त्यानंतर निवडणूक झाल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांतच पुन्हा ८ लाख ७५ हजार रुपयांचे बिल उचलण्यात आले. प्रत्येक कुत्र्यामागे १,९०३ रुपये असा दर आकारण्यात आला असतानाही, चिखली शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हे कुत्रे लहान मुलांवर हल्ले करत असून त्यांना चावण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि असंतोषाचे वातावरण आहे. हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे. म्हणूनच ‘कुत्ता बिर्याणी खाणाऱ्यांचा निषेध असो’ असा संतापजनक नारा द्यावा लागला असल्याचे त्यानी सांगितले.
या आहेत काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रमुख मागण्या
१. चिखली नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी मागील सहा महिन्यांच्या कालावधीत सर्वसाधारण सभा आयोजित न झाल्याबाबत कलम ८१(१-अ) नुसार जिल्हाधिकारी कार्यालयास लेखी अहवाल सादर केला होता किंवा नाही, याची अधिकृत चौकशी करण्यात यावी.
२. अहवाल सादर केला असल्यास संबंधित अहवालाची प्रत सादर केल्याची तारीख आवक क्रमाक व त्यासंबंधीचा पत्रव्यवहार उपलब्ध करून देण्यात यावा.
३. अहवाल सादर केला नसल्यास त्यामागील कारणांची चौकशी करून मुख्याधिकाऱ्याऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
४. जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल प्राप्त झाला असल्यास त्यावर सात दिवसांच्या कालावधीत कोणती कार्यवाही करण्यात आली. याची तपासणी करण्यात यावी.
५. कलम ८१(१-अ) अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वतःहन सर्वसाधारण सभा बोलावण्यासंदर्भात कोणती
कार्यवाही केली होती किंवा नाही, याची पडताळणी करण्यात यावी.
६. मुख्याधिकारी आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कायदयातील निर्धारित कर्तव्यांचे पालन केले आहे किंवा नाही, याची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.
७. चौकशीमध्ये कलम ८१(१-अ) मधील तरतुदीचे उल्लंघन किंवा कर्तव्यात कसूर झाल्याचे आढळल्यास जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
८. सदर प्रकरणातील चौकशीचा संपूर्ण अहवाल, संबंधित पत्रव्यवहार व करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती तक्रारदारांना लेखी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात यावी.






