पीक कर्ज नाकारल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; बँकांना तात्काळ सूचना देण्याची तहसीलदारांकडे मागणी!

मलकापूर : सातबारा उताऱ्यावर इतर बँकेचे कर्ज असल्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या गंभीर प्रकाराची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार, मलकापूर यांना निवेदन देण्यात आले.
सातबारा उताऱ्यावर दुसऱ्या बँकेचे कर्ज असल्याच्या कारणावरून पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवू नये. संबंधित बँकांना तात्काळ लेखी सूचना देऊन पात्र शेतकऱ्यांचे पीक कर्ज मंजूर व वितरित करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आधीच शेतकरी शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत बँकांच्या नियमांच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक न करता त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी तहसीलदार साहेबांना निवेदनाच्या माध्यमातून मांडली व आंदोलनाचा इशारा दिला.






