अजित पवारांच्या व्हीएसआर विमान प्रवासाच्या आकडेवारीवरून नवनाथ बन यांचा रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल !

राज्याच्या राजकारणात अजित पवार यांच्या विमान प्रवासाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आरोपप्रत्यारोपांचे सत्र तापले आहे. त्यांच्या निधनापूर्वीच्या चौदा महिन्यांच्या चार्टर विमान प्रवासाची सविस्तर आकडेवारी एबीपी माझाच्या माध्यमातून समोर आली असून, त्यातून व्हीएसआर ही विमान कंपनीच त्यांची पहिली पसंती असल्याचे स्पष्ट झाले आहे. या नव्या माहितीच्या आधारे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले. त्यापूर्वीच्या म्हणजेच ८ डिसेंबर २०२४ ते २८ जानेवारी २०२६ या चौदा महिन्यांच्या कालावधीत त्यांनी एकूण १०४ वेळा चार्टर विमानाने प्रवास केल्याची नोंद समोर आली आहे. या १०४ प्रवासांपैकी जवळपास ८५ वेळा त्यांनी व्हीएसआर कंपनीच्याच विमानांची निवड केली होती, तर केवळ १९ वेळा इतर कंपन्यांच्या विमानांना प्राधान्य दिले होते. टक्केवारीचा विचार करता जवळपास ८२ ते ८३ टक्के वेळा त्यांची पसंती याच कंपनीला होती. या विमानांद्वारे त्यांनी केवळ महाराष्ट्र राज्यातच नव्हे, तर देशभरातील विविध भागांत दौरे केले होते.
अजित पवार यांच्या निधनानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत व्हीएसआर कंपनीच्या संपूर्ण विमान सेवेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली होती. इतकेच नव्हे, तर एका छायाचित्राचा आणि कंपनीच्या मालकांशी असलेल्या संबंधांचा आधार घेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री संबंधित कंपनीला पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
आता समोर आलेल्या माहितीनुसार, केवळ अजित पवार नव्हे, तर पवार कुटुंबातील इतर सदस्यांनीही वारंवार याच कंपनीची सेवा वापरली आहे. शरद पवार यांनी अनेकदा मुंबई ते दिल्ली प्रवासासाठी व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा वापर केल्याचे दिसून येते. तसेच सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार हेदेखील सातत्याने याच कंपनीला पसंती देत असल्याची शक्यता नवनाथ बन यांनी व्यक्त केली. याशिवाय रोहित पवार यांनी स्वतः एका क्रिकेट सेलिब्रिटीसोबत व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याचे व्हिडिओ माध्यमे आणि समाजमाध्यमांवर उपलब्ध असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
या आकडेवारीवरून रोहित पवार या प्रकरणात केवळ स्टंटबाजी आणि नौटंकी करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा घणाघात नवनाथ बन यांनी केला. यापूर्वी अनेक प्रकरणांत तोंडघशी पडलेले रोहित पवार या नव्या आकडेवारीमुळे पुन्हा तोंडघशी पडल्याशिवाय राहणार नाहीत, असे ते म्हणाले. अजित दादा यांची राजकीय जागा मिळवण्यासाठी आणि त्यांच्यावर केवळ आपलेच प्रेम असल्याचे दाखवण्यासाठी हा राजकीय भांडवल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली. व्हीएसआर कंपनी २०१३ पासून म्हणजेच गेल्या पंधरा ते सोळा वर्षांपासून राज्य सरकारला, प्रमुख राजकीय नेत्यांना आणि महाराष्ट्रतील नामवंत सेलिब्रिटींना चार्टर विमान सेवा पुरवत आहे. आजही अनेक नेते ही सेवा वापरतात; मात्र महाराष्ट्रतील सुज्ञ जनतेला हे सर्व कळत असून रोहित पवार यांना केवळ नौटंकी करायची असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला.
राजकारणात कोणत्याही संवेदनशील घटनेनंतर आरोपप्रत्यारोप होणे नवे नाही. मात्र, समोर येणारी आकडेवारी आणि दोन्ही बाजूंचे दावे पाहता या विषयावरील राजकीय वाद आणखी काही काळ सुरूच राहण्याची चिन्हे आहेत. अशा मुद्द्यांवर राजकीय टीकाटिप्पणीपेक्षा पारदर्शक तथ्य जनतेसमोर येणे अधिक गरजेचे ठरते.
Related
खानदेशमाहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्र...
खानदेशमयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या म...
बुलढाणासावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह...
खानदेश

