दुष्काळाच्या आगीत होरपळणाऱ्या महिलांच्या घरावर फायनान्स कंपन्यांचे धाडसत्र; सक्तीची वसुली तात्काळ थांबवा, तालुका काँग्रेस व महिला बचत गटांची मागणी ,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा
प्रतिनिधी प्रशांत चव्हाण
नांदुरा: (दि.27 नोव्हेंबर)
पावसाअभावी तालुक्यात दुष्काळाचे भीषण सावट असताना आणि हाताला काम नसल्याने ग्रामीण भागातील महिलांवर उपासमारीची वेळ आली असताना, दुसरीकडे मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खाजगी बँकांनी कर्जवसुलीच्या नावाखाली महिलांचा अमानुष छळ सुरू केला आहे. “घरात खायला अन्न नाही, तर हप्ते कुठून भरायचे?” असा आर्त सवाल करणाऱ्या महिलांच्या दारात जाऊन एजंटांकडून धमक्या आणि मानसिक त्रास दिला जात आहे. या जुलमी वसुली विरोधात नांदुरा तालुका काँग्रेस आणि दहिगाव महिला मंडळाने आक्रमक पवित्रा घेतला असून, महिलांना तातडीने आठ महिन्यांची व्याजमुक्त कर्जफेड सवलत द्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा खणखणीत इशारा रविवार, २३ नोव्हेंबर रोजी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
तालुक्यात यंदा पावसाने दडी मारल्याने शेती कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. मोलमजुरीवर पोट भरणाऱ्या महिलांच्या हातात एक रुपयाही शिल्लक नाही. अशा संवेदनशील परिस्थितीत मुख्यमंत्री महोदयांनी दोन महिन्यांची स्थगिती जाहीर केल्याचे सांगितले जात असतानाही, मायक्रो फायनान्स कंपन्या शासकीय निर्णयांना जुमानत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.
स्वतंत्र बँक, ग्रामशक्ती, फिनकेअर, आरोहन बँक, ग्रामीण कुट, नम्मा फायनान्स, राजर्षी शाहू बँक, ॲक्सेल बँक आणि सहयोग बँक यांसारख्या संस्थांचे प्रतिनिधी थेट महिलांच्या घरात घुसून हप्ते भरण्यासाठी दबाव टाकत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या महिलांना अपमानित करून आणि धमकावून कर्जाच्या खाईत ढकलण्याचा हा प्रकार संतापजनक असल्याची भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनामध्ये महिलांच्या घरी जाऊन होणारी दमदाटी आणि मानसिक छळ त्वरित बंद करावा.
८ महिन्यांची व्याजमुक्त सवलत: दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता कर्जफेडीसाठी किमान आठ महिन्यांची मुदतवाढ द्यावी आणि या कालावधीतील व्याज पूर्णपणे माफ करावे.
सिबिल स्कोअरला संरक्षण: या सवलतीच्या काळात थकबाकी दाखवून कोणत्याही महिलेचा सिबिल स्कोअर खराब करू नये, याची शासनाने लेखी हमी द्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
सदर निवेदन देताना काँग्रेसचे निलेश पाऊलझगडे, पुरुषोत्तम झाल्टे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुरा, ज्ञानेश्वर डामरे, शंकर बोदळे, राजू पाटील, डॉ. तुकाराम झालटे, रामेश्वर काळे, रमेश कांडेलकर, रवींद्र खंडारे, रतन जवरे, वाल्मीक मुकुंद, गणेशराव मुकुंद, अमोल भुमरे, मिराताई राठोड, सुनीताताई इंगळे, कल्पना साठे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि पीडित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आता प्रशासन या मुजोर फायनान्स कंपन्यांना लगाम घालणार की महिलांचा उद्रेक पाहणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
”हाताला काम नाही, तर पैसे आणायचे कुठून,
एकीकडे दुष्काळाने शेतकरी आणि शेतमजूर उद्ध्वस्त झाला आहे, तर दुसरीकडे या फायनान्स कंपन्या गिधाडासारख्या महिलांच्या दारावर जाऊन वसुलीचा तगादा लावत आहेत. शासनाच्या मुदतीला हरताळ फासणारी ही सक्तीची वसुली तात्काळ थांबली पाहिजे. महिलांना धमकावणे किंवा अपमानित करणे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास महिलांना सोबत घेऊन या अन्यायाविरोधात उग्र आंदोलन उभारू.”
— पुरुषोत्तम झाल्टे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुरा. (फोटो नांदुरा- तहसीलदार यांना निवेदन देताना उपसभापती पुरुषोत्तम झाल्टे ,निलेश पाउलझगडे, बचत गटांच्या महिला व काँग्रेस पदाधिकारी)
Related
खानदेशसहकारातील एका जागेने वाढवली शिंदेसेनेची धाकधूक; चंद्रकांत पाटील यांच्या ...
बुलढाणासमाजसेवेचा समृद्ध वारसा जपणारे राजेशाही व्यक्तिमत्त्व : कै. रंगनाथ विठोब...
बुलढाणापशुखाद्याच्या दरवाढीने दुग्धव्यवसाय अडचणीत; दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल...
बुलढाणा

